कांदा पोहे

Posted by Vinay Yadav On
कांदा पोहे

नुकताच माझा पहीला वहीला
’कांदा पोहे’ संपन्न झाला.
अन वाटले मला,
जणु हल्ला माझ्या ’उनाड’ स्वातंत्र्यावर झाला.
मला सोबत म्हणुन जवळच्या मित्रास ’बोलावणे’ होते,
त्याचा ’आत्ताच उठलो’ म्हणुन
तिथे पाहुण्यांच्या ’दारात’ निरोप आला.
जसे भरवश्याच्या म्हशीला (इथे रेड्याला) टोणगा,
अन सा-या मोठ्यांमध्ये माझ्या एकट्याचा ’पोरग्या’ झाला.
थोरामोठ्यांच्या ’चर्चे’नंतर माझीही ’विचारपुस’ झाली,
त्या नंतर कुठे मुलीला ’चालवण्या-बोलवण्याचा’ योग आला,
सा-यांचे प्रश्न संपल्यावर प्रश्नाच्या अपेक्षेने माझ्याकडे पाहीले.
(कुठला प्रश्न आठवतो तेवढ्यात !)
क्षणभर माझ्याच चेह-याचा प्रश्नचिन्ह झाला.
(त्याचं कारण असं की, मला माझ्या मित्राची वाक्ये आठवली होती तेव्हा: “अरे त्यात काय ? विचार म्हंटले कि विचारायचं ’सांग पोरी, for loop - while loop सांग !’, नाहीतर एखादा sample program विचारुन पाहा !” हे आठवुन जे हसु येत होते ते लपवत असतानाच सा-यांनी माझ्याकडे पाहिले म्हणुन माझे तसे झाले ! असो, पुढे….)
मग आले कांदा पोहे
सा-यांचे संपले म्हणुन शेवटी शेवटी
मी ’न चावता गिळता घास’ घेतला
’चहा मी घेत नाही’ म्हंटल्यावर
माझी ’निकोटिन’ पेक्षा ’प्रोटिन’ची गरज त्यांना जाणवली असेल,
कारण कॊफी ऐवजी आतमध्ये ’बोर्नविटा’ तयार झाला.
तिकडे मित्रांनी मला
miscall देन्याचा सपाटा केव्हाच केलेला सुरु,
’फोन बंद ठेव’ म्हणुन घरच्यांनी आधीच सांगीतलेले
ते न ऐकल्याने स्वत:चाच राग थोडा आला.
कार्यक्रम संपवुन निघावे एकदाचे वाटले,
कारण ’शांत बसणे’ जमले नाही जन्मात
पण, यावेळेस तासभर शांत बसण्याचा रेकोर्ड नवा झाला.
अशाप्रकारे माझा पहीला वहीला
’कांदा पोहे’ संपन्न झाला.
अन वाटले मला,
जणु हल्ला माझ्या ’उनाड’ स्वातंत्र्यावर झाला.