मैत्रीचा बोन्साय झालाय
अरे आजच्या जगात
मैत्रीचा बोन्साय झालाय.
शाळेत बागडलेली मैत्री
कॉलेज मधे उपवर झाली,
“आयुष्यभर सोबत हवी” म्हणताना
या (धावत्या) आयुष्यात तिचाच विसर पडलाय…
जिवलग म्हणवणारे सारे
इतके कसे दुरावले ?
त्यांच्याच आठवणींचे अश्रु बनुन
फक्त नजरेत उतरणं चाललंय.
म्हणुन वाटतं मैत्रीचा बोन्साय झालाय.
वेळे अगोदर हजर असणा-यांना
कसा आज ’वेळ’ कमी पडलाय,
शब्दा पलीकडच्या बोलण्याला
कसा आज शब्दांचाच अभाव आलाय.
जणु भावनांची मुळे खुंटली,
पण आठवणींचा ओलाव्याने तग धरलाय.
म्हणुनच एवढ्या मोठया वट वॄक्षासारख्या
मैत्रीचा बोन्साय झालाय.