तुला कसले भय आहे
भिक मागायला लाग
तुझे लग्नाचे वय आहे
कुठे तरी गाठ तू
अडलेला मुलीचा बाप
त्याच्या मागे लाग तू
होउन अस्तनीतला साप
सारे बळ एकवटून
कर तू असा हल्ला
आयुष्याच्या कमाईवर
त्याच्या तू मार डल्ला
पुत्ररत्न जन्म घेतला
आता फेड पांग तू
काय तुझी किंमत
वधूपित्याला सांग तू
तुझ्या आईबापाच्या
नवसाला पाव तू
तिच्या आईबापाला
भिकेला लाव तू
मागताना जमले तर
मान तुझी ताठ ठेव
काय मागनार आहे
यादी तेवढी पाठ ठेव
मागायचे ते माग तू
त्यात कसली लाज
हिच तर वेळ आहे
दाखवायला तुझा माज
तुझी कर्तबगारी काय
हा मुद्दा गौण आहे
विचारलेच तर सांग
आज माझे मौन आहे
लुटताना तू त्यांना
असे लुटले पाहीजे
तिच्या बापाचे धोतर
कशाला सुटले पाहीजे?
मर्दानगीचा असा काही
एक बाजार मांड तू
कवडी कवडीसाठी
जीव तोडून भांड तू
लिलावच कर तुझा
मालच तसा खास तू
माणुसकीच्या नावाला
का़ळीमा फास तू
"मला काही नको पण
आई बापाची ईच्छा आहे"
कारण काही असो
त्यांच्या मागे पिच्छा आहे
शेवटी मात्र एक
घासलेटचा डबा माग तू
उशीर मुळीच नको
आत्ताच तयारीला लाग तू